ठाणे Matters

हात धुण्यासाठी मोबाइल बेसीन्सची निर्मिती

रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टचे अध्यक्षा सुधा शंकरनारायण यांचे विशेष सहयोग

विषाणूच्या संसर्गाने आणि भयाने सर्व जग त्रस्त आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. स्वच्छता हा त्यातीलच एक पैलू.ह्या प्रयत्नात रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्टने हात धुण्यासाठी मोबाइल बेसीन्सची निर्मिती केली आहे. त्यापैकी एक बेसीन नुकतेच आनंद दिघे प्रवेशद्वारापाशी असलेल्या पोलिस चौकीजवळ बसवले आहे,यानिमित्त क्लबच्या अध्यक्षा सुधा शंकरनारायण यांच्याशी बोलताना त्यांनी अशी वाॅश बेसीन्स ठाण्यात ठिक ठिकाणी बसवण्याचा मानस व्यक्त केला.

ह्यात त्यांनी भाजी मार्केट, मंदिरे, सरकारी कार्यालये, चौक, शाळा, अशा ठिकाणांचा उल्लेख केला. ह्या प्रकल्पाचे प्रमुख रोटरीयन सतीश माने म्हणाले, या बेसीन्समुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही. पाणी येण्यासाठी नळाला हाताचा स्पर्श करावा लागणार नाही आणि बेसीन्स मोबाइल असल्याने कोरोनावर विजय मिळाल्यावर ती आजूबाजूच्या खेड्यात वापरासाठी नेता येतील पण ही नंतरची बाब असल्याचेही ते म्हणाले.

अशी पन्नास एक बेसीन्स तयार असून ठाण्यातील सर्व रोटरी क्लब यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत असे रोटरियन सुधा शंकरनारायण म्हणाल्या. यात सर्वांचा सहभाग घेतला जाणार असून बेसीन्स जवळ साबण व सॅनिटायझर्स ठेवण्याची जबाबदारी परिसरातील नागरिक घेणार आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होईल असेही सुधा शंकरनारायण विश्वासाने म्हणाल्या.

Leave a comment