आज महाराष्ट्र कोरोना महामारी संकटाचा सामना करतोय. लॉक-डाऊन मुळे प्रत्येक माणसाला खूप मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागतंय पण सामान्य माणूस सगळं सहन करतोय,का?तर त्याला आशा आहे सगळं सुरळीत होईल आणि परत एकदा आपण आपली स्वप्ने घेऊन नव्याने भरारी घेऊ. आपल्या राज्यात काही लोकांचे पोट हातावर आहे.सरकार रोज नवनवीन उपाययोजना जाहीर करतंय. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,जेणेकरून जे कमवते हात थांबलेत, त्यांना काहीतरी आधार- जसे कर्जाचे हप्ते ,अथवा घराचे भाडे, रेशनवरचे सामान,शाळेची फी अश्या महत्वाच्या घटकांत दिलासा मिळेल .अनेक सामजिक संस्था बऱ्याच ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करत आहेत. हे का? तर ह्या महामारीची साखळी तोडताना जनतेनी सर्व नियम पाळून घरात राहावे. पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल प्रत्येक माणसाला आहे. घरात बसून आता पुढे जगण्याला मार्ग मिळेल की नाही ह्या विचारात असलेला स्वप्नाळू माणूस आपल्या सरकारवर विश्वास आहे म्हणून ठाम आहे. पण आता वाईट वाटतय की ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे आपण अभिमानाने म्हणतो. ‘कणखर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा’ ही आमची ओळख. बाजूच्या राज्यावर संकट आले की मदत करण्याची आपली महाराष्ट्रीयन संस्कृती पण आज काय ही भयाण राजकीय परिस्थिती!भविष्यात ह्या राजकीय व्यक्तींना हा इथला मराठी माणूस माफ करणार नाही जी ह्या कठीण प्रसंगातही राजकारण करू पाहताहेत कारण इथे सर्वसामान्य मराठी जनता स्वतःला कोंडून जीवन जगतेय आणि इथे ह्यांच राजकारण चाललंय.कोणाला कुठे खिंडीत गाठायचे ह्याचे डावपेच सुरुयेत.त्याची खुर्ची मला कशी मिळेल ह्याची ईर्ष्या प्रत्येक वाक्यात ओसंडून वाहते. अरे सोडा हे सगळं, राजकारण करायला खूप वेळ आहे आणि संधी सुद्धा मिळतील पण आत्ताच्या संकटावर एकत्र येऊन मात करा. सर्वसामान्य माणूस स्वतःला कोंडून घेऊन घरात बसलाय. त्याच्या मनात एक आशा आहे की आता काहीतरी चांगली बातमी येईल आणि पुन्हा मी एक नवीन सुरुवात करेन पण इथे सगळं उलटं चालू आहे.काही लोकांचे ह्या कठीण प्रसंगाचा फायदा घेता येतोय का? सत्तेची समीकरणे बसवता येतात का?ह्याकडे डोळे लागलेत. तुम्ही दिलेली मदत नकोय,आज महाराष्ट्राला हवंय ते फक्त तुम्ही घेतलेली काळजी. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवूया आणी एकत्र ह्या संकटाशी सामना देऊया
Categories: ठाणे Matters











