Bhandup matters

प्रिय  ***
नमस्कार..

    आपले नित्य मेसेज वाचून आपल्यातील मैत्री अधिकच बिलगलीय. त्या मेसेज मधील आपल्या शब्दातून एक वेगळाच कंप जाणवला, वाक्यांचा सूर आपली व्यथा कथुन गेला, वाक्यातील अंतरातून आपली घालमेल जाणवली आणि त्याहीपलीकडे सर्व मजकुरातून धैर्यापासून माणूस फारकत घेतोय याचा आभास झाला. त्या अनुषंगाने ही अंतर्मनाची शब्दगुंफन…

         निसर्गाच्या कोणत्याही कृत्यातून आपण नाराज होऊ नये, महामारी संबंधीचे मेसेज अजिबात वाचू नका, कारण त्यामुळे आपण खूप नाउमेद होतो, आपले धैर्यचे खच्चीकरण होते. हा रोग भयाण आहेच पण त्यापेक्षा जास्त माणसाला घाबरवले गेले आहे, त्यातून बाहेर येणे गरजेचे आहे. मी स्वतः असले मेसेज पाठवत नाही, वाचतही नाही आणि फॉरवर्ड तर मुळीच करीत नाही हे आपणास ज्ञात आहेच., मी गेली चारपाच वर्षे सहसा टीव्ही पण पाहत नाही या फालतू अवास्तव, नकारात्मक, अनावश्यक बातम्यांमुळे, कारण त्यातून काहीच साध्य होत नाही, ज्ञान तर नाहीच नाही. यासाठी माझा सकाळ चा मेसेज म्हणजे नवनवीन, प्रेक्षणीय मंदिर हे या संकटकाळी एका देवाचे दर्शन असते, आशीर्वाद असतो, ज्या देवदेवतांच्या कृपेने आपण जगतो त्याने सर्वांना सुखी, समाधानी ठेवावे ही इच्छा असते. सर्वांची सध्या “स्थिती आणि मनस्थिती” मी समजू शकतो.

    नियतीच्या या कठीण परीक्षेला प्रत्येकाला सामोरे जायचंय, पर्याय कोठे आहे? ” माणूस मरणाला घाबरत नाही, तो घाबरतो, त्याच्यावर सामाजिक नियमातून कर्तव्य म्हणून नात्यांनी दिलेल्या कौटुंबिक जबाबदारीला जी त्याने अनाहूतपणे पेललेली असते”. जो जबाबदारीच घेत नाही त्याला मरणाचे किंवा कसलेच भय नसते. म्हणून जबाबदारपणा हा मोठा मानसन्मान आहे आणि तो सक्षमपणे पेलणे ही एक अत्युत्तम कला आहे. जबाबदारीचे ओझे पेलताना अनायासे सुख दुःख जास्त असणारच, कोणीही त्याला अपवाद नाही. अशा जबाबदाऱ्या पेलणाऱ्या व्यक्तींना समाज मान सन्मान देतेच. सर्व संस्थांनी वाटलेली प्रशस्तीपत्र मोजली तर पेशंट पेक्षा कोरोना योध्ये जास्त झालेत हे चित्र समोर येईल. ज्यांनी जीवाची बाजी लावून कार्य केलंय तो योद्धा ठीक आहे. पण “योद्धा” या महान शब्दाचा अवमान करणारी प्रशस्तीपत्र हल्ली सर्वत्र बोकाळलीत, माणसे मरताहेत त्यांच्यातही स्वतःची पाठ थोपटण्याचा हा प्रकार माणुसकीचे अवमूल्यन करणारा वाटतो.

     आपल्याला नित्य मेसेज पाठवणे शक्य होत नाही असे लिहिलंय. हे स्पष्टपणे कळवल्याने आपल्याबद्धलचा आदर आणखी वाढलाय. हेही दिवस जातील. माझे हे विचार काळजीपूर्वक वाचल्यास आपल्याला या महामारीतून, त्रस्त अवस्थेतून बाहेर येण्याचा मार्ग, निदान किरण आशेचा नजरेच्या टप्प्यात येईल व त्यामुळे आपली इच्छाशक्ती, मनोबल, धैर्य वाढेल, अशी माझी धारणा आहे.
खूप खुप धन्यवाद..काळजी घ्या, आपली, आपल्या कुटुंबाची, नात्यापरीवाराची, म्हणजेच समाजाची काळजी आपसूक घेतली जाईल .. कधीही, काहीही मागण्याचा आपण लिहिलेला आपला हक्क अबाधित आहे, मी तुमच्याकडे अपेक्षा करणे हाही माझा हक्क आहेच ना..? जेव्हा नाउमेद, त्रस्त असाल तेव्हा दूरध्वनी करा, आपण बोलू थोडा वेळ, तेवढाच विरंगुळा व मन रिक्त होईल. मैत्रीचा, नात्यांचा हात अलगद खांद्यावर पडतो तेव्हा क्षीण कसा दूर जातो हे सांगायला नकोच पण हल्ली नियम घालून दिलेत. मन मोकळे करायला मैत्री सारखे नंदनवन भूतलावर नसावे.
—दीपक सावंत

Categories: Bhandup matters

1 reply »

  1. आपण माझे मनोगत, शब्दगुंफन प्रसिद्ध करून जनतेच्या चरणी पाठवलीत त्यासाठी धन्यवाद, या माझ्या शब्दांतून, वैचारिक मार्गदर्शनातून बोध घेऊन काही लोकांना जरी धैर्य प्राप्त झाले व उद्दीग्नतेतून बाहेर आला तर त्यातून मला मिळणारे समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त मौल्यवान असेल. आभार..

    Like

Leave a reply to दीपक सावंत Cancel reply